वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा बहिण - भावाने केला खून | पुढारी

वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा बहिण - भावाने केला खून

बारामती : पुढारी वृत्तसेवा

वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेला बेदम मारहाण करत तिचा खून केल्याप्रकरणी बहिण-भावाविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दवाखान्यातून मृत महिलेला परस्पर नेत तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची कुजबुज गेली आठवडाभर बारामतीत सुरु होती. अखेर पोलिसांनी चौकशीअंती तब्बल १२ दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

ऋषिकेश प्रमोद फरतडे व अनुजा प्रमोद फरतडे (रा. कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डाॅ. सुनील रामदास पवार (रा. पवारवस्ती, शारदानगर, माळेगाव खुर्द) यांनी याबाबत फिर्य़ाद दिली. डाॅ. पवार यांचे बारामतीत हाॅस्पिटल आहे. संशयितांचे वडील प्रमोद उर्फ दादा नामदेव फरतडे हे गेल्या तीन वर्षांपासून डाॅ. पवार यांच्याकडे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत. दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी घरी असताना अनुजा हिने फोन करत वडीलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले असून त्या दोघांना मी व भाऊ ऋषिकेश यांनी काठीने मारले असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादीने त्यांचा उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

अनैतिक संबंध : डॉक्टरांना मृत्यूचे कारण बदलण्यासाठी फोन

दि. ११ रोजी सकाळी साडे सहा वाजता अनुजा हिने संबंधित महिलेचा श्वास चालत नसून तिला ऋषिकेश याने बारामतीतील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले.  तेथे डाॅक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे सांगितले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अनुजाने फिर्यादी डॉक्टरांना फोन करत आम्ही संबंधित महिलेच्या नातेवाईकांना तुमच्या हाॅस्पिटलला घेवून येतो, तुम्ही तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे सांगा, अशी विनंती केली. डाॅ. पवार यांनी तसे करण्यास नकार दिला.

दुपारी साडे बाराच्या सुमारास ऋषिकेश हा रुग्णवाहिकेतून मृत महिलेला घेवून डाॅ. पवार यांच्या हाॅस्पिटल पार्किंगमध्ये आला. तेथे पवार यांनी तिचा चेहरा पाहिला असता ती चार ते पाच तासांपूर्वीच मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. डाॅक्टरांनी उत्तरीय तपासणीसाठी तिला सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर मृत महिलेच्या मुलीने डाॅ. पवार यांची भेट घेत माझ्या आईचा मृत्यू नेमका कशाने झाला अशी विचारणा केली. डाॅक्टरांनी तिला सिल्व्हर ज्युबिलीत जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित महिलेला रुग्णवाहिकेतून नेत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान या घटनेत संशयितांच्या वडिलांनाही मार लागला होता. त्यांच्यावर डाॅ. पवार यांच्या हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दि. १९ पर्यंत ते हाॅस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळी त्यांनीही मुलगा व मुलीने मारहाण केल्याचे सांगितले. दि. २२ रोजी डाॅ. पवार यांना महिलेच्या मृत्यूसंबंधी शहर पोलिस ठाण्यात चौकशीकामी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बहिण-भावाने मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच मृत महिलेला मोबाईल व वडिलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक अधिक तपास करत आहेत.

Back to top button