पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आईचा एका तरूणाने महिलेचा कुत्र्याच्या पट्टयाने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. गुरुवारी (दि. १८ जानेवारी) रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास पाषाणमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपीला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
वर्षा क्षीरसागर (वय ५८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवांशु दयाराम गुप्ता (वय २३, रा. मोहनवाडी, येरवडा) तरुणाला या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. यातील संबंधीत २२ वर्षीय तरूणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुप्ता याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी २००४ पासून आपल्या आईसोबत सुसरोड परिसरात वास्तव्यास आहे. वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. आरोपी शिवांशु गुप्ता हा मुळचा आगरा येथील असून, तो डिलीव्हरी बॉयचे काम करतो. डेटींग अॅपच्या माध्यमातून फिर्यादी तरुणी आणि त्याचा सात महिन्यापूर्वी परिचय झाला होता. पुढे दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला.
तरुणी १७ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका मित्राकडे गेली होती. दुसर्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास ती घरी परतली तेव्हा तिला, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. तिने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तरुणीची आई बाथरुमध्ये पडलेली आढळून आली. तिच्या तोंडातून रक्तस्त्राव होताना दिसून आला. दरम्यान महिलेच्या गळ्याला कुत्र्याला बांधण्याचा बेल्ट घट्ट बांधलेला दिसून आला. पोलिसांच्या मदतीने महिलेला औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गुप्ता या तरुणीला वारंवार त्रास देत होता. या त्रासाविरोधात आईने तरुणाला जाब विचारल्याचे देखील तरुणीने सांगितले.
खूनाचा प्रकार समोर आल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, रुपेश चाळके यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली तेव्हा १८ जानेवारी रोजी रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी गुप्ता सोसायटीत जिन्याने वरती जाताना आणि परत पावने एक वाजता खाली येताना दिसला. तरुणीला त्याचे चित्रीकरण दाखवले असता, तिने तो गुप्ताच असल्याचे सांगितले. संशयित आरोपी गुप्ताला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.