Maratha Reservation : ‘अजूनही त्यांनी थांबावे, अशी सरकारची इच्छा,’ मराठा समाजाला अजित पवार यांचा सल्ला | पुढारी

Maratha Reservation : 'अजूनही त्यांनी थांबावे, अशी सरकारची इच्छा,' मराठा समाजाला अजित पवार यांचा सल्ला

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. परंतु मराठा समाज ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने जरांगे पाटील यांच्यासह समाज मुंबईला चालला आहे. अजूनही त्यांनी थांबावे, अशी सरकारची इच्छा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाबाबत राज्य सरकार काय करत आहे, हे सांगितले. राज्य सरकारच्या कामाला प्रतिसाद द्यावा, मुंबईकडे कूच करू नये, अशी मागणी केली. मागासवर्ग आयोगासंदर्भातील माहिती काढण्यासाठी काही वेळ लागतो आहे. परंतु जरांगे पाटील यांनी, जेवढा वेळ पाहिजे तेवढा दिलेला आहे, असे सांगत मुंबईकडे ते आता निघाले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. संविधानाचा आदर राखून प्रत्येक जण आपला निर्णय घेवू शकतो.
आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी अजूनही थांबावे अशी सरकारची इच्छा आहे. परंतु आज मराठा समाज ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटी प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे.

मंत्रीमंडळासह अयोद्धेला जाणार

अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी मुख्यमंत्री व मला निमंत्रण आले होते. परंतु अन्य मंत्र्यांना सोमवारी तेथे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापुढील काळात सगळ्या मंत्रीमंडळाला घेवून अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तारीख ठरवून लवकरच आम्ही जावू असे सांगत अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ मंदिर उभारणीचा निश्चय केला. तो यानिमित्ताने पूर्णत्वाकडे जात आहे. राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली असून शासकीय इमारतींवर रोषणाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button