शिवसंग्राम लोकसभेच्या तीन जागा लढविणार; विधानसभेसाठी 12 जागांची मागणी | पुढारी

शिवसंग्राम लोकसभेच्या तीन जागा लढविणार; विधानसभेसाठी 12 जागांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्व. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीने गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नव्हता. मात्र, विधानसभेला दिलेले दोनही उमेदवार निवडून आले. या वर्षीच्या लोकसभेला शिवसंग्राम तीन उमेदवार देणार असून विधानसभेला 12 जागांची अपेक्षा असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसंग्रामच्या वतीने राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन आणि चिंतन शिबिरानंतर ते बोलत होते. या वेळी शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती विनायक मेटे, राज्य सरचिटणीस विक्रांत आंब्रे, राज्य सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, चेतन भालेराव, हिंदुराव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, साहेबांच्या निधनानंतर शिवसंग्रामचे काय होणार असे अनेकांना प्रश्न पडले होते. मात्र, आजही प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला असून त्याच ताकदीने राज्यात काम सुरू आहे. आगामी काळात शिवसंग्राम पूर्ण ताकदीने समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचणार असून सर्वसामान्यांची कामे करणार आहे. शिंदे म्हणाले, शिवसंग्रामच्या वतीने गेल्या लोकसभेला एकही उमेदवार दिलेला नव्हता. मात्र, यावर्षी आमच्या पक्षाला तीन जागांची अपेक्षा आहे. आम्ही सत्तेत असलेल्या भाजपबरोबर घटकपक्ष म्हणून सहभागी असून यापुढेही भाजपबरोबरच राहणार आहे. विधानसभेला बीडमधील आमच्या जागेवर ज्योती मेटे यांना उमेदवारी देणार असून अजून 12 जागांची अपेक्षा आहे. आगामी काळात मतदार संघाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

अडचणी समजून आरक्षण द्यावे

स्व. विनायक मेटे यांनी सुुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासाठी लढा दिला आहे. त्यांच्या लढ्यानंतर मध्यंतरी मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. परंतु, आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही. सध्या ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यांना आगामी काळात आरक्षण मिळणारच आहे. मात्र, ज्यांच्याकडे कोणतेच प्रमाणपत्र नाही त्यांच्या बाबतीत सरकारने तांत्रिक अडचणी समजून घेत त्या सर्वांना आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सांगितले.

सरकारकडून शिवस्मारकाला उशीरच

स्व. विनायक मेटे यांच्या पुढाकारातून समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार होते. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सरकारकडून कोणतीच फारसी हालचाल झालेली नाही. शिवसंग्रामच्या वतीने त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून आगामी काळातही स्मारकासाठी प्रयत्न करणार, असे तानाजी शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button