पार्किंगचालकांकडून प्रवाशांची लूट | पुढारी

पार्किंगचालकांकडून प्रवाशांची लूट

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड रेल्वे स्थानकामधून दररोज किमान सात ते आठ हजार नागरिक प्रवास करतात. शहरातील सर्वाधिक प्रवासी संख्या याच स्थानकामधून प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, चिंचवड स्थानकाबाहेरील पार्किंग व्यवस्थापक वाहनचालकांकडून पाच रुपयाची पावती देऊन, दहा रुपये उकळत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. याकडे रेल्वे सुरक्षा बल, प्रशासकीय विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे या ठिकाणी वाहने लावणार्‍या प्रवाशांचे म्हणणे आहे.

चिंचवड स्थानकातील रिझर्वेशन सेंटर बाहेरील पार्किंगमध्ये ठेकेदाराने काही व्यक्ती पैसे घेऊन पावती देण्यासाठी बसवली आहेत. या व्यक्ती पावती पाच रुपयाची देऊन दहा रुपये उकळत आहेत. प्रवाशांनी जाब विचारल्यावर टेंडर बदलण्यात आल असून, आता दहा रुपये घेतले जाणार आहेत. अशी माहिती या व्यक्ती देतात. चिंचवड स्थानकात पार्किंगच्या नावाखाली येथे वाहने लावणार्‍यांची आर्थिक लूट सुरू आहे. मात्र, या घटनेकडे कोणाचेही लक्ष नसल्याने पार्किंगच्या ठेकेदाराचे फावले आहे.

पार्किंग बाहेरच्या वाहनांना साखळ्या

पार्किंगच्या बाहेर लावण्यात आलेल्या वाहनांना पार्किंगचालक चक्क लोखंडी साखळ्या लावून ठेवतात. इतर ठिकाणी वाहने लावल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याने मनमानी कारभार करत हे पार्किंगचालक वाहनांना साखळ्या लावून ठेवतात. वाहनचालक वाहनांजवळ आल्यावर पैशाची मागणी करतात. नंतरच वाहनाची साखळी काढून वाहन संबंधितांना दिले जाते.

रेल्वे पोलिसांचा नाही धाक

रेल्वे परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिस दल आहे; परंतु या पोलिसांचा धाक नसल्याने पार्किंग चालकांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट केली जात आहे. पार्किंगचालक पोलिसांनादेखील जुमानत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

रेल्वे विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी सदैव तत्पर आहे. पार्किंगचालकांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने तत्काळ कारवाई केली जाईल.

– मिलिंद हिरवे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, वाणिज्य.

हेही वाचा 

Back to top button