शिर्डी-शेगावच्या धर्तीवर आळंदीचा विकास व्हावा : नितीन गडकरी | पुढारी

शिर्डी-शेगावच्या धर्तीवर आळंदीचा विकास व्हावा : नितीन गडकरी

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील साईबाबांचे शिर्डी देवस्थान असो वा गजानन महाराजांचे शेगाव देवस्थान असो वा तिरुपतीचे बालाजी देवस्थान असो; त्या देवस्थानप्रमाणेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी देवस्थानचा देखील विकास व्हायला हवा, यासाठी देवस्थानने पुढाकार घेऊन विस्तृत विकास आराखडा राबविणे गरजेचे आहे. त्यात देवस्थानच्या विश्वस्तांनी सूचना जरूर कराव्यात. पण, आराखडा एक चांगल्या आर्किटेक्टकडूनच बनवून घ्यावा, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

आळंदी देवस्थानच्या वारकरीकेंद्रित बहुउद्देशीय ज्ञानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी शांतिब्रह्म मारुतीबाबा कुर्‍हेकर, खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, डॉ. नारायण महाराज जाधव, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त योगी निरंजननाथ, अ‍ॅड. विकास ढगे, डॉ. भावार्थ देखणे, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, लक्ष्मीकांत देशमुख, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चोपदार, थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, माजी विश्वस्त सारंग जोशी, प्रशांत सुरू, उमेश बागडे, भाजपचे पांडुरंग ठाकूर, भागवत आवटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी गडकरी यांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत आरती केली. तद्नंतर कार्यक्रमस्थळी येत विधिवत मंत्रोच्चारात प्रकल्पाचे भूमिपूजन केले. प्रास्ताविकात बोलताना विश्वस्त अ‍ॅड. उमाप यांनी साडेचारशे एकर जमिनीवर असलेले सामाजिक वनीकरण शेरे उठविण्याची मागणी केली. इंद्रायणी प्रदूषण आराखडा मंजुरी व पालखी मार्ग दुरुस्ती वेगाने व्हावी, अशी मागणी केली. त्यावर गडकरी यांनी पालखी मार्ग काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा

Back to top button