मोहोळवरील हल्ला फसल्यानंतर आरोपींची वकिलांसोबत बैठक | पुढारी

मोहोळवरील हल्ला फसल्यानंतर आरोपींची वकिलांसोबत बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड शरद मोहोळ याला ठार मारण्याचा प्रयत्न ऑक्टोबर महिन्यात झाला होता. मात्र, तो फसला होता. त्यानंतर मुन्ना पोळकर आणि नामदेव कानगुडे यांची वकिलांसोबत पिरंगुट परिसरात बैठक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली. मोहोळ खून प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या अ‍ॅड. रवींद्र पवार आणि अ‍ॅड. संजय उडान यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना गुरुवारी (दि. 11) एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

याखेरीज, गुन्हे शाखेने बुधवारी अटक केलेल्या धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने वकिलांची रवानगी येरवडा कारागृहात केली. तर, वटकर व शेडगे याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तांबे म्हणाले, वटकर आणि शेडगे यांनी मध्यप्रदेशमधून चार शस्त्रे मागविली होती. त्यानंतर ती आरोपींना देण्यात आली. त्यातील तीन शस्त्रे जप्त करायची आहेत.

आरोपींनी आणखी काही शस्त्रे पुरविली आहेत का तसेच शस्त्रे पुरविणार्‍या वितरकाचाही शोध घ्यायचा आहे. वकिलांव्यतिरिक्त अटक अन्य सहा आरोपींनी ऑक्टोबरमध्ये मोहोळवर खुनी हल्ला करायचा प्रयत्न केला. तो फसला होता. यानंतर आरोपीसह दोन्ही वकिलांची पिरंगुटमध्ये बैठक झाली होती. ते नेमके कुठे भेटले? आणखी कोण बरोबर होते? त्याच्या मास्टरमाईंडचा शोध घ्यायचा आहे. या दोघांना मास्टरमाईंड कोण आहे? हे माहिती आहे. यातून मोठा कट समोर आला आहे. दोघांना मोहोळ याचा खून होणार याची माहिती होती.

आरोपींच्या शरण येण्याचा दावा पोलिसांनी खोडला

मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम यांच्याबरोबर आरोपी वकिलांचे संभाषण झाले होते. त्यांनी आरोपी यांना नवी मुंबईला येऊन हजर करा किंवा तिथल्या भागातील इतर कोणत्याही पोलीस ठाण्यात हजर व्हा असा सल्ला दिला होता. तरीही ते विरुद्ध दिशेला का पळाले? कात्रज परिसरात दोन पोलीस चौक्या होत्या, नाकाबंदी लागली होती. कुणालाही सांगितले असते की हे या खुनाच्या केस मधील आरोपी आहेत तर कुणीही अटक केली असती असे सांगून आरोपींचा पोलिसांना शरण येण्याचा दावा सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी खोडून काढला.

पुढच्या वेळी बंदोबस्त वाढवा

खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आल्याने सुनावणी ऐकण्यासाठी कोर्ट रूम मध्ये वकिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वकीलांच्या गर्दीमुळे आरोपींना कटघर्‍यापर्यंत आणणे जिकरीचे झाले होते. त्यावर वकिलांना उद्देशून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार म्हणाले की, कोर्ट रूम ही वकिलांबरोबरच पक्षकार आणि पोलिसांची सुद्धा आहे. याचे भान सगळ्यांनी ठेवावे. तसेच, पुढच्या वेळी पोलिस बंदोबस्त वाढवावा असे सुद्धा सांगितले.

हेही वाचा

Back to top button