‘डीपीसी’चा 1128 कोटी 84 लाखांचा आराखडा मंजूर; अजित पवारांची मंत्रालयात बैठक | पुढारी

‘डीपीसी’चा 1128 कोटी 84 लाखांचा आराखडा मंजूर; अजित पवारांची मंत्रालयात बैठक

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2024-25 च्या 948 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेंतर्गत 135 कोटी आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत 45 कोटी 84 लाख रुपये अशा एकूण एक हजार 128 कोटी 84 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यात आराखडा मंजूर करण्यात आला.

बैठकीस दुरदृश्य प्रणालीद्वारे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेंतर्गत ग्रामीण विकास, जनसुविधा 125 कोटी, नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी 141 कोटी, आरोग्य सुविधा 51 कोटी 16 लाख, रस्ते विकास 105 कोटी, अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा विकास 95 कोटी, पर्यटन विकास 53 कोटी 44 लाख, हरित महाराष्ट्र 62 कोटी, महिला व बालकांचे सशक्तीकरण 28 कोटी 44 लाख, गतिमान प्रशासन 75 कोटी 84 लाख, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती 16 कोटी 65 लाख, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर 47 कोटी 40 लाख, क्रीडा कलागुणांचा विकास 30 कोटी 20 लाख आणि नावीन्यपूर्ण योजनेसाठी 41 कोटी 86 लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.

सर्वसाधारण योजनेंतर्गत 2023-24 या वर्षात 590 कोटी रुपये म्हणजेच 83.72 टक्के निधी खर्च झाला आहे. राज्यात पुणे जिल्हा प्रशासकीय मान्यता व वितरित निधीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 12.80 टक्के आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 52.95 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. मार्चअखेर 100 टक्के निधी खर्च करण्याचे नियेाजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी दिली. विविध यंत्रणांची मागणी लक्षात घेता 2024-25 साठी 369 कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस मुंबई येथील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षातून आमदार दिलीप मोहिते पाटील, सुनिल शेळके, अतुल बेनके, दूरदृष्य प्रणालीद्वारे आमदार उमा खापरे, दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button