शरद मोहोळ खून; पत्नी राजकारणात तर पती रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार

शरद मोहोळ खून; पत्नी राजकारणात तर पती रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार
पुणे / कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : कोथरूडमधील कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (40) याच्यावर शुक्रवारी दुपारी पिस्तुलातून चार गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सुतारदरा येथील मोहोळच्या घरापासून जवळच असलेल्या त्याच्याच कार्यालयासमोर घडली. गोळीबारामध्ये मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सुरुवातीला कोथरूड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकृत घोषित केले.
गोळीबार झाल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने मोहोळचे कार्यकर्ते कोथरूड येथील रुग्णालयाबाहेर जमले होते. मोहोळच्याच परिसरात त्याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी खून करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याच्याच निकटवर्तीयांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक वाद की वर्चस्व संघर्ष, अशी खुनाची विविध कारणे पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहेत.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर विविध संघटनांच्या आणि राजकीय व्यासपीठांवर दिसून येत होता.
गुन्हेगारी कृत्यानंतर खर्‍या अर्थाने मोहोळ चर्चेत आला तो दहशतवादी कतिल सिद्धिकीचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये खून झाल्यावर. त्याचा आरोप मोहोळवर होता. हे प्रकरण देशभर चर्चिले गेले. त्याचा फायदा घेत त्याने आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले  होते. या गुन्ह्यातही त्याला अटक झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या  प्रभावी कारवाईमुळे पुण्यातील कुख्यात टोळ्यांच्या वर्चस्ववादाचा संघर्ष शांत होता. अनेक टोळीप्रमुख आणि त्यांच्या सदस्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. मात्र, आता मोहोळवरील गोळीबारामुळे कोथरूडमधील गँग आणि गँगस्टर पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. यामुळे त्याच्या कार्यालयात नातेवाईक आणि चाहत्यांची गर्दी होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून बाहेर पडत होता, तेवढ्यात  गर्दीतून चौघे जण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर पिस्तूलातून बेछूट गोळीबार केला. यामध्ये त्याच्या खांद्याला आणि त्याखाली गोळ्या लागल्या. हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी गोळ्याच्या पुंगळ्या पडल्या होत्या.
कतिलच्या खुनानंतर शरद मोहोळ चर्चेत 
गुन्हेगारी टोळीतील गँगवॉरमध्ये शरद मोहोळ एका खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याचवेळी दहशतवादाच्या आरोपाखाली पकडून येरवडा कारागृहात ठेवलेल्या कतिल सिद्दिकीचा कारागृहातच खून झाला. त्याबाबतचा आरोप शरद मोहोळवर ठेवण्यात आल्याने तो चर्चेत आला होता. त्या आरोपातून तो निर्दोष सुटला. मात्र, सध्या तो जामिनावर कारागृहाबाहेर होता.

टोळी युध्दाची सुरुवात नव्वदच्या दशकात 

 या टोळी युध्दाची सुरुवात नव्वदच्या दशकात पुण्यात आयटी हब उभारणीच्या प्रारंभापासून झाली. कोट्यवधींची गुंतवणूक पुण्यात होऊ लागल्याने जमिनींचे भाव गगनाला भिडले होते. जमीन व्यवहारातील या उलाढालीमुळे या क्षेत्रात गुन्हेगारांचा शिरकाव झाला. त्यांच्यातील वैमनस्याचे रूपांतर पुढे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बदलले.  याच वर्चस्ववादातून गँगवॉरला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली ती 2005 मध्ये. मारणे टोळीतील अनिल मारणे याच्यावर झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.  त्याच टोळीतील रसाळचा 2006 मध्ये खून झाला. या दोन्ही खुनांच्या प्रकरणात संदीप मोहोळ याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जमिनी रिकाम्या करणे, सातबारे क्लीअर करणे, अशा स्वरूपाच्या कामातून संदीप मोहोळ याची टोळी व्यावसायिक वर्चस्व निर्माण करीत होती.
अशा व्यवहारातून मिळालेल्या मोठ्या पैशातून तो पुढे राजकारणाकडे वळला. एका राजकीय पक्षात प्रवेश करीत तो गावचा सरपंच झाला. दरम्यान, दोघांचे खून झाल्याने मारणे टोळीही संदीप मोहोळच्या मागे लागली होती. अनिल मारणेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी संदीप मोहोळवर चारवेळा हल्ला देखील केल्याची माहिती पोलिसांनी दिली. संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरूडकडे जात असताना त्याला कोथरूडला अडवून त्याच्या गाडीची काच फोडली व गोळ्या घालून त्याचा खून केला. याप्रकरणी गणेश मारणे याच्यासह 18 जणांवर आरोपपत्र दाखल झाले होते.
गणेश मारणे कारागृहात गेल्यानंतर टोळीची सूत्रे किशोर मारणे याच्याकडे गेली. संदीप मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळीतील गुन्हेगारांनी किशोर मारणेचा नीलायम टॉकीजजवळ खून केला. याप्रकरणी शरद मोहोळसह सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. तो येरवडा कारागृहात असताना त्याने मोठे कांड केले. संशयित दहशतवादी म्हणून पकडलेल्या कतिल सिद्दिकीचा त्याने कारागृहात साथीदाराच्या मदतीने नाडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप झाला.  याप्रकरणी दोघांवर आरोपपत्र दाखल झाले. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले होते.

पत्नी राजकारणात तर पती रेकॉर्डवरील गुन्हेगार

कारागृहात शरद मोहोळने आपली वेगळी प्रतिमा तयार केली. मारणेच्या खुनाच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयात शरदला जामीन मंजूर झाला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर शरद मोहोळ विविध राजकीय नेत्यांशी जवळीक निर्माण करीत होता. नुकताच त्याच्या पत्नीने एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला होता, तर त्याचाही वावर संघटनांच्या कार्यक्रमांच्या व राजकीय मंचावर वाढला होता. यातच त्याच्यावर हा खुनी  हल्ला झाला.

शरद मोहोळचा गुन्हेगारी रेकॉर्ड

 • कोथरूड पोलिस ठाणे 525/04 भादवि कलम 324, 504, 427 (निर्दोष)
 • डेक्कन पोलिस ठाणे 683/07 भादवि कलम 395, 397, 384, 34 (निर्दोष)
 • पौड पोलिस ठाणे 187/08 भादवि कलम 394, 34
 • पौड पोलिस ठाणे 68/09 भादवि कलम 394, 34
 • पौड पोलिस ठाणे 77/11 भादवि कलम 364-अ, 34
 • पौड पोलिस ठाणे 90/11 भादवि कलम 384, 385, 34 (निर्दोष)
 • दत्तवाडी पोलिस ठाणे 3147/09 भादवि कलम आर्म अ‍ॅक्ट 3, 4 (25)
 • दत्तवाडी पोलिस ठाणे 9/10 भादवि कलम 302, 143, 147, 148, 149,
 • आर्म अ‍ॅक्ट 3, 4 (25) 17 जून 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षा
 • कोथरूड पोलिस ठाणे 434/09 भादवि कलम 324, 34 (निर्दोष)
 • खडकी पोलिस ठाणे 3013/12 आर्म अ‍ॅक्ट 3 (25) 120 ब इतर (न्यायप्रविष्ठ)
 • वारजे माळवाडी पोलिस ठाणे 33711 भादवि कलम 395, 364, 120 ब, 342, 387, मोक्का (निर्दोष)
 • येरवडा 266/12 भादवि कलम 302, 201, 34, (निर्दोष)
 • खडक पोलिस ठाणे 115/15 भादवि कलम 387, 109, 34 मोक्का (निर्दोष)
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news