नाटक माझ्या चष्म्यातून; नाटकांमध्ये सामाजिक बदल प्रतिबिंबित व्हावेत

नाटक माझ्या चष्म्यातून; नाटकांमध्ये सामाजिक बदल प्रतिबिंबित व्हावेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बदलत्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. परिणामी, आज मराठी नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होत आहे. नाटक हे अतिशय प्रभावी माध्यम आहे, नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजेत, त्यामध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित व्हायला हवे, असा सूर शुक्रवारी (दि. 5) परिसंवादात उमटला. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमानिमित्त 'नाटक माझ्या चष्म्यातून' हा परिसंवाद आयोजिला होता. यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, युवराज शहा, पुणे ग्रामीण पोलिस सहअधीक्षक मितेश घट्टे सहभागी झाले होते. त्यांच्याशी राजेश दामले यांनी संवाद साधला.

श्रीनिवास पाटील म्हणाले, मराठी नाटकांना मोठी परंपरा आहे. अनेक नाटकांनी सामजिक परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. आज नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजेत, त्याशिवाय प्रेक्षक वाढणार नाही.
उल्हास पवार यांनी नाटक हे परिवर्तनाचे माध्यम आहे, त्यात सातत्याने प्रयोग झाले पाहिजेत. त्याशिवाय प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळणार नाहीत, असे सांगितले. तृप्ती देसाई यांनी नाटक हे समाजाचा अविभाज्य अंग आहे, असे मत व्यक्त केले. मितेश घट्टे यांनी माणूसपण आणि माणुसकी जपणारी नाटके लिहिली जावीत, असे नमूद केले.

नाटक, साहित्य, चित्रपट हे समाजातील वास्तवतेचे दर्शन घडवत असतात. समाजातील चांगल्या वाईटावर प्रकाशझोत टाकत असतात, तसेच, चुकीच्या घटनांवर ताशेरे ओढण्यासोबतच चांगल्या आणि योग्य गोष्टी समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात, त्यामुळे या माध्यमांचा अधिक प्रभावीपणे वापर होणे आवश्यक आहे, असाही सूर उमटला.

शुभारंभ कार्यक्रमाकडे राजकीय नेत्यांची पाठ

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका व्यासपीठावर असतील, अशी अपेक्षा नाट्यरसिकांना होती. मात्र, फक्त उद्योगमंत्री उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित होते आणि इतर राजकीय नेत्यांनी मात्र शुक्रवारी (दि.5) कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही कार्यक्रमासाठी एकाच मंचावर उपस्थित राहतील, असे नाट्यरसिकांना वाटले होते. पण, दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. आता पिंपरी – चिंचवडमधील संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात तरी दोघे एकत्र असतील का, हे आज शनिवारी नाट्यरसिकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news