

वडगाव मावळ : टाळ मृदंगाचा गजर… विठुनामाचा जयघोष… अशा भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल परिवार मावळच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ सोमवारी झाला. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी हभप एकनाथमहाराज चत्तर यांची कीर्तनसेवा झाली.
परमार्थामध्ये साक्षात्कार होण्यासाठी चिंतन लागते, प्रतीक्षा लागते आणि मग प्राप्ती होते, असा संदेश हभप चत्तरमहाराज यांनी कीर्तन सेवेच्या माध्यमातून दिला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचा मोठा जनसागर लोटला होता. याप्रसंगी शांतिब्रह्म हभप मारुतीमहाराज कुर्हेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कीर्तन महोत्सवाच्या भव्य दिव्य मंडपात अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. प्रशस्त मंडप, पार्किंग व्यवस्था व सुयोग्य नियोजनामुळे विठ्ठल परिवाराच्या कीर्तनास तालुक्यातील कानाकोपर्यातून नागरिक येत असतात. मागील सहा वर्षांपासून ही अखंड सेवा आमदार शेळके यांच्या माध्यमातून होत आहे.
महोत्सवाच्या सुरुवातीला विश्व फाउंडेशनच्या सहकार्यातून सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले होते. अग्निहोत्र हा मन समृद्ध करण्याचा महामार्ग आहे, तणावमुक्त व आरोग्य संपन्न समाज यातून घडत आहे, असे मत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी व्यक्त केले.
हेही वाचा