नाट्य संमेलनाच्या ‘नेपथ्य’ची जबाबदारी श्याम भूतकर यांच्यावर | पुढारी

नाट्य संमेलनाच्या ‘नेपथ्य’ची जबाबदारी श्याम भूतकर यांच्यावर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड शहरात आयोजित शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नेपथ्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ नेपथ्यकार श्याम भूतकर करणार आहेत. गेली 40 वर्षे नाट्यसृष्टीत कार्यरत असणारे श्याम भूतकर हे स्वतः एक नाट्य कलावंत असून वेशभूषा, सेट डिझायनिंग, पेटींग आदी क्षेत्रात ते कार्यरत आहे. ’पुरुषोत्तम करंडक’ पासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द हिंदी, मराठी नाटक, चित्रपट अशी खूप मोठी आहे. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा, शबाना आजमी, अनुपम खेर, अशोक सराफ, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आदी दिग्गज कलाकारांच्या चित्रपट व नाटकांच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.

1985 साली श्याम भूतकर यांना ’रावसाहेब’ या मराठी चित्रपटासाठी ’उत्तम कला दिग्दर्शक’ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. जवळपास 40 वर्षे नाटयक्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर मागील काही वर्षांपासून त्यांनी कला दिग्दर्शनाचे आपले काम थांबवले होते; मात्र जेव्हा 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नेपथ्य उभारणीसाठी आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी त्यांना विचारले असता, त्यांनी आनंदाने होकार दिला.याविषयी बोलताना भूतकर म्हणाले की, माझा जन्म पुणे शहरातला.

माझ्या कारकिर्दीची सुरुवात देखील पुण्यातूनच झाली. गेली 40 वर्षे मी मराठी व हिंदी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. पण मागील सहा वर्षांपासून मी कलादिग्दर्शनाचं काम थांबवलं होत. अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सोबत मी काम केलेलं आहे. जेव्हा आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य संमेलनाच्या कला दिग्दर्शनासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांच्या चित्रपटांचे देखील मी कला दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे या सोहळ्याचे कलादिग्दर्शन करण्याची संधी मला मिळणे हे माझ्यासाठी भाग्यशाली आहे.

हेही वाचा

Back to top button