विजयस्तंभ सोहळ्यात संघटनांच्या सूचनांची अंमलबजावणी : डॉ. राजेश देशमुख | पुढारी

विजयस्तंभ सोहळ्यात संघटनांच्या सूचनांची अंमलबजावणी : डॉ. राजेश देशमुख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली असून सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी 55 सूचना केल्या असून, त्यांचा अंतर्भाव विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

जल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, पीएमपीएलचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, काँग्रेसचे मिलिंद आहिरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. 210 एकरात 33 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था, पीएमपीएल बसेससाठी 4 ठिकाणी थांब्याची सोय, राखीव वाहनतळ, वीज, आकर्षक रोषणाई, बुक स्टॉल, शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी 150 टँकर्स, फिरते शौचालय, आरोग्यसेवेसाठी 15 पथके, 259 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, 50 रुग्णवाहिका, 27 जनरेटर सेट, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकासोबत स्वयंसेवक इत्यादी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 4 हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरेगाव भीमा विजय दिन समन्वय समितीच्यावतीने वेळोवेळी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव नियोजनात असल्याने आतापर्यंत केलेल्या नियोजनामुळे आम्ही समाधानी आहोत, असे समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button