पिंपरी-चिंचवड इन्क्युबेशन सेंटर स्टार्टअपसाठी व्यासपीठ : आयुक्त शेखर सिंह | पुढारी

पिंपरी-चिंचवड इन्क्युबेशन सेंटर स्टार्टअपसाठी व्यासपीठ : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप युनिटची सुरुवात करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन देणे, स्टार्टअपला सहाय्य करणे, या उद्देशाने पिंपरी चिंचवड इन्क्युबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून नव्या स्टार्टअप्सला गुंतवणूकदार, तज्ज्ञ मार्गदर्शक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने सेंटर एक व्यासपीठ ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि.21) केले.

उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबाने, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, संचालक दीपक महेंद्र, रेजी मथाई, सुधीर आगाशे, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मासरे यांच्यासह इन्क्युबेटर्स उपस्थित होते. आयुक्त सिंह म्हणाले, नवीन व्यवसायांमधील अंतर भरून काढण्यासाठी नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करण्यावर भर आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात अनुकूल स्टार्टअप इको-हब तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शक आणि गुंतवणूकदारांसोबत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप योजना राबविली जात आहे.
सध्या 50 स्टार्टअप कार्यरत आहेत. तसेच, 18 विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांचे पथक कार्यरत आहे. या व्यतिरिक्त विविध उपक्रमांच्या अंतर्गत अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रशिक्षण, सेमिनार्स, कार्यशाळा, बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे विपणन (मार्केटिंग) या विविध विषयांसंदर्भात सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.

हेही वाचा

 

Back to top button