डीपी रस्त्यांचा अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला आदेश | पुढारी

डीपी रस्त्यांचा अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला आदेश

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव बुद्रुक परिसरातील डीपी रस्ते अद्याप कागदावरच असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार माजी आमदार विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.  महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्यापही तयार झालेला नसून, प्रशासन यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुदतवाढ मागत आहे.
आताही महापालिकेने अंतिम आराखडा सादर करण्यास  आगामी 1 मार्चची मुदत मागितली आहे. डीपी रस्त्यांचे काम झाले असते, तर वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सुटली असती. यामुळे नागरिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
विकास आराखड्यातील मंजूर डीपी रस्ते लवकरात लवकर करावेत, अशी मागणी आंबेगाव परिसरातून माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, संतोष ताठे, संदीप बेलदरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.  तसेच, याबाबतचे निवेदन शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. त्याची दखल घेत शिंदे यांनी महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महापालिकेच्या रटाळ कारभारामुळेच आंबेगाव बुद्रुक परिसरातील डीपी रस्ते अद्यापही कागदोपत्रीच आहेत. यातून वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून डीपी रस्त्याचा प्रश्न सोडवावा व नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी.

-संतोष ताठे, माजी सरपंच

हेही वाचा

Back to top button