हवामान बदलाचा पिकांवर परिणाम : डॉ. हिमांशू पाठक यांचे प्रतिपादन | पुढारी

हवामान बदलाचा पिकांवर परिणाम : डॉ. हिमांशू पाठक यांचे प्रतिपादन

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : कांदा व लसूण पिकाच्या संबंधी सध्याच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संशोधन आणि संशोधनाचा वापर यातील पोकळी भरून काढणे गरजेचे आहे. भविष्यात हवामान बदलासोबतच कांदा आणि लसूण पिकातील समस्या अधिक गडद होणार आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी समस्या ओळखून त्या हातळणीसाठी नवीन कल्पना आणि त्यातून नवीन उद्यम उभे राहणे गरजेचे आहे. असे मत राष्ट्रीय कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी व्यक्त केले. ते पुण्यात ‘कांदा व लसूण’ विषयावर आयोजित राष्ट्रीय औद्योगिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कांदा आणि लसूण पिकाच्या क्षेत्रातील उद्यम संधी आणि उद्योगांना उभारी देण्यासाठी संशोधक आणि विविध उद्योजक तसेच हितधारकांना एकत्र आणणार्‍या तीन दिवसीय औद्योगिक परिषद आणि पारिसंवादाचे आयोजन पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन परिषद, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच इंडियन सोसायटी ऑफ अलीयम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त- महासंचालिका डॉ. निरू भूषण, परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मनी, पंजाब कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. अजमेर धत्त, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रशांत गिरबाने, संचालक डॉ. विजय महाजन तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधि, शेतकरी, स्टार्टअप, शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कुमार तसेच आभार प्रदर्शन परिसंवादाचे आयोजन सचिव वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी केले.

परिसंवाद, प्रकाशने, मार्गदर्शन

तीन दिवसांच्या या औद्योगिक परिषद आणि परिसंवादाच्या पहिल्या दिवशी कांदा आणि लसूण पिकाच्या परीपेक्षातून बियाणे आणि कृषी पुरवठा साखळी, प्रक्रिया आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि सेन्सर आधारित तंत्रे, विपणन आणि मूल्य साखळी व्यवस्थापन तसेच कृषीमध्ये नवीन स्टार्टअप्स आदी विषयांवर संबंधित विषयातील उद्योग, विषय तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्यात संवाद घडवून आणला गेला. संशोधकांनीदेखील त्यांच्याकडे उपलब्ध तंत्रे, त्यांचे व्यावसायीकरण आणि उद्योगांच्या समस्यांवर तांत्रिक मार्गदर्शन केले. सोबतच मान्यवरांच्या उपस्थितीत संचालनालयाच्या विविध प्रकाशनाचे अनावरण करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button