जे. एम. रस्त्याला सुगीचे दिवस; देखभालीसाठी दोन कोटी | पुढारी

जे. एम. रस्त्याला सुगीचे दिवस; देखभालीसाठी दोन कोटी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चाळीस वर्षांहून अधिक काळ खड्डेमुक्त राहिलेल्या जंगली महाराज रस्त्यावर मागील काही वर्षांत दुरुस्तीची कामे करून महापालिकेने या रस्त्याचा लौकिक जपला आहे. आजमितीला या रस्त्यावरील पदपथही सुशोभीत करण्यात आले आहेत. तरीही या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याने नेमके कोणती कामे केली जाणार आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स. गो. बर्वे चौकापासून थेट डेक्कन चौकापर्यंतच्या जंगली महाराज रस्त्याचे 1976 मध्ये डांबरीकरण करण्यात आले आहे. अगदी आठ ते नऊ वर्षांपूर्वीपर्यंत दुहेरी वाहतूक असलेल्या या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढल्यानंतर तो एकेरी करण्यात आला. हा रस्ता एकेरी करताना रस्ता दुभाजक काढून टाकण्यात आले. त्यानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत या रस्त्याचे सुशोभीकरण करून तो विकासित केला. त्यामध्ये पदपथ प्रशस्त केले गेले. पदपथावर बसण्यासाठी कट्टे, झाडे लावण्यात आली. एवढेच नव्हे, तर सायकल ट्रॅकही करण्यात आला आहे. ही कामे झाली असतानाही गेल्या 47 वर्षांत अनेक पावसाळे झेलूनही या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. त्यामुळे हा रस्ता आदर्श प्रमाण मानला जातो.

मात्र, पावसाळ्यांमध्ये फर्ग्युसन रस्त्यावरून येणार्‍या पावसाचे पाणी संभाजी उद्यान परिसरात साठून राहात असल्याने जंगली महाराज रस्त्याला तळ्याचे स्वरूप येऊ लागले आहे. प्रशासनाने याचा शोध घेतल्यानंतर पदपथाचे काम करताना तसेच मेट्रो स्टेशनच्या कामामुळे पावसाळी गटार बंद झाल्याचे आढळून आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने दुरुस्ती करून घेतली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यावरील गरवारे चौक ते सुभाषचंद्र बोस चौक या दरम्यानच्या देखभाल दुरुस्तींच्या कामासाठी 2 कोटी 75 लाखांची निविदा प्रक्रिया राबविली आहे.

या कामासाठी 7 निविदा आल्या होत्या. त्यापैकी 3 पात्र ठरल्या. निविदेपेक्षा 11 टक्के दराची निविदा अर्थात सुमारे 2 कोटी 5 लाख रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. रस्ता तर खड्डेमुक्त आहे. पदपथही नव्याने तयार केलेले असल्याने सुस्थितीत आहेत. असे असताना या निविदेतून नेमकी कोणती देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे, याचा तपशील मात्र विषयपत्रात देण्यात आलेला नाही. त्यामुळे शंका उपस्थित करण्यास वाव मिळत आहे.

जंगली महाराज रस्त्यावर ठिकठिकाणी शोभेसाठी प्लांटेशन केले आहे. त्यांची देखभाल दुरुस्ती (मेन्टेनन्स) तसेच या रस्त्यावर झेब—ा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यासाठी पाच वर्षांसाठी निविदा काढण्यात आली आहे. यापूर्वीच्या ठेकेदाराची कामाची मुदत संपल्याने नव्याने निविदा काढली आहे. तसेच जंगली महाराज रस्त्याच्या कडेला असलेल्या काही मिळकतींनी रस्त्यालगत असलेल्या जलवाहिन्यांतून पाण्याची कनेक्शन घेतल्याने तेथे रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचे काम करण्यासाठी ही निविदा राबविण्यात आली.

– दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग.

हेहा वाचा

Back to top button