शहरातील निवासी वसतिगृहांना व्यावसायिक कर आकारण्यास विरोध | पुढारी

शहरातील निवासी वसतिगृहांना व्यावसायिक कर आकारण्यास विरोध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांची वसतिगृह आणि पेईंग गेस्ट चालविणार्‍या मिळकतींसाठी व्यावसायिक दराने मिळकतकर आकारण्यास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश निकम यांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांनाच बसणार असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे या मिळकतींना व्यावसायिक कर लावण्यावर प्रशासन ठाम आहे.

शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमुळे शहरात दरवर्षी चार ते पाच हजार कोटी रुपये उलाढाल होत आहे. त्याचा लाभ शहरालाच होत आहे. विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक हे शहरातील अनेक मिळकतींमध्ये पेईंग गेस्ट किंवा वसतिगृहात भाडे देऊन राहतात. अशा मिळकतींना व्यावसायिक दराने मिळकतकर लागू केल्यास त्यांच्या मिळकतकरात अडीच ते तीनपट वाढ होईल. परिणामी, या मिळकतधारकांना विद्यार्थ्यांकडून घेत असलेल्या भाड्यात वाढ करावी लागेल. त्यामुळे त्याचा आर्थिक भार गरजू विद्यार्थ्यांवरच येईल, असे निकम यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ज्या वसतिगृहांमध्ये मेस, कॅन्टिन, दुकाने, लाँड्री आहे, त्या दुकानांना व्यावसायिक कर लावावा, असे निकम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वसतिगृहे व पेईंग गेस्ट राहणार्‍या मिळकतींना व्यावसायिक कर आकारण्यावर महापालिका प्रशासन ठाम आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त म्हणाले, वसतिगृह किंवा पेईंग गेस्टच्या माध्यमातून इमारतीचे मालक पैसे मिळवतात. अनेक वसतिगृहे व इमारतींमध्ये नोकरी करणार्‍यांसाठी निवासाची सोय असे फलक विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे अशा मिळकतींची पाहणी करून व्यावसायिक कर लावण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button