जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी. वैयक्तिक मालकी असलेल्या जागेचे दानपत्र करून घ्यावे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. कामाच्या प्रगतीबाबत प्रत्येक आठवड्यात आढावा घ्यावा. वनविभागाची जागा, गायरान, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वैयक्तिक मालकीच्या जागा व इतर जागांबाबतच्या अडचणीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरित करून घ्याव्यात, तसेच कामांची गती वाढविण्याच्याही सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. कार्यकारी अभियंता खताळ यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.