Pune News : सर्व काही राजकीय फायद्यासाठी? घोरपडीतील नागरिकांत चर्चा | पुढारी

Pune News : सर्व काही राजकीय फायद्यासाठी? घोरपडीतील नागरिकांत चर्चा

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल डिसेंबर 2023 अखेर वाहतुकीस खुला करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, राजकीय फायद्यासाठी सध्या या पुलाचे काम संथगतीने सुरू असून, पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून तीन-चार महिने लागतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
घोरपडीतील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डापुलाचे सप्टेंबर 2019 मध्ये भूमिपूजन झाले होते.

या पुलाचे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्या वेळी प्रशासनाने दिले होते. 2022 ला होणारी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या पुलाचे नियोजन केल्याचे नागरिक सांगतात. मात्र, त्यानंतर कोरोना काळ, तसेच महापालिका निवडणुका लांबल्याने या पुलाचे काम जाणीवपूर्वक संथगतीने होत आहे. 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदर या पुलाचे उद्घाटन करायचे व त्याचा राजकीय फायदा उचलायचा, असे काही राजकीय नेत्यांचे नियोजन सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पुलाच्या मध्यभागी रेल्वे लाईनवर पुलाला जोडणारा गर्डर टाकण्यास रेल्वे प्रशासनाची मान्यता अद्याप मिळालेली नाही. ती लवकरच मिळेल. त्यानंतर दोन महिन्यांत हे काम पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला केला जाईल.

– श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभाग प्रमुख, पुणे महापालिका

घोरपडी येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी रहिवाशांनी मागील वीस वर्षांपासून शासनदरबारी संघर्ष केला आहे. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना नागरिकांच्या अडचणींची पर्वा न करता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ राजकीय स्वार्थासाठी या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.

– विशाल कवडे, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा

Back to top button