दुर्गम भागातील आव्हानांसाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग करा: मनोज पांडे | पुढारी

दुर्गम भागातील आव्हानांसाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग करा: मनोज पांडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा आगामी काळात दुर्गम भागातील आव्हानांना सामोरे जाताना आपल्या पदवी शिक्षणात मिळवलेल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग करा, असे आवाहन देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पुणे येथील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज (सीएमई)च्या दीक्षांत समारंभात केले. पुणे शहरातील चिंचवड भागातील सीएमई या संस्थेत देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते तेथील विद्यार्थी, अधिकारी तसेच मित्र राष्ट्रांतून आलेल्या विद्यार्थी सैनिकांना अभियांत्रिकीची पदवी प्रदान केली.

देशाच्या विविध भागातून आलेले 40 लष्करी अधिकारी तर मित्र राष्ट्रांतील 7 अधिकार्‍यांना त्यांनी पदवी प्रदान केली. यात सैन्य दलातील 32 अधिकार्‍यांना स्थापत्य, 7 अधिकार्‍यांना इलेक्ट्रिकल, 7 अधिकार्‍यांना बी. टेक. मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी आणि विविध विषयातील सुवर्णपदकेही प्रदान करण्यात आली.

गुंतागुंतीच्या आव्हानांना द्या प्रत्युत्तर

लष्करप्रमुखांनी दीक्षांत सोहळ्यात 16 मिनिटांच्या भाषणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सीमेवर लढताना कसा करावा, यावर विशेष भर दिला. ते म्हणाले, पदवीधर अधिकार्‍यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यकतांमुळे वाढत्या गुंतागुंतीसह बहुसंख्य आव्हानांना सामोरे जावे लागेल. बहुतेक दुर्गम भागात अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्हाला येथे मिळालेल्या अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा उपयोग करावा लागेल.

जवानांच्या कुटुंबीयांची भेट

लष्करप्रमुख पांडे यांनीदेखील पुण्याच्या याच महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यामुळे या परिसरात वावरताना त्यांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अत्यंत आस्थेने त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजीतून संवाद साधत जवान, त्यांचे कुटुंबीय, संस्थेतील कर्मचारी आणि पत्रकार यांची आवर्जून चौकशी करीत अनौपचारिक चर्चाही केली.

हेही वाचा

Back to top button