Pune Drugs Case : ललितची येरवडा कारागृहात रवानगी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयातून पळून गेल्याच्या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला ड्रग तस्कर ललित पाटीलची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
त्यापैकी न्यायालयीन कोठडी अंतर्गत ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, तेथून पळून गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ललित पाटीलसह त्याचा चालक सचिन वाघ याला 29 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. त्यांना 30 नोव्हेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ललित पाटीलला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी तपास अहवाल सादर केला. तसेच, त्याची पोलिस कोठडी राखून ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
हेही वाचा

