पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार!

पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड, राजगड, तोरणा गडकोटांसह वेल्हे व हवेली तालुक्यांना जोडणार्‍या खानापूरमार्गे रांजणे-घाट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एका बाजूला चकाचक डांबरी रस्ता, तर दुसर्‍या बाजूला घाटरस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, उन्मळेल्या दरडी धोकादायक झाल्या आहेत.

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. खड्डे बुजवून घाटरस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे; अन्यथा 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ व नागरिकांनी दिला आहे. हायबि—ड अम्युनिटी प्रकल्पाच्या योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून घाटरस्त्याचे काम सुरू आहे. खानापूरपासून पाबेपर्यंत डोंगरांतील रस्ता वन विभागाच्या हद्दीत असून, या खात्याच्या हरकतीमुळे धोकादायक वळणावर रस्त्याचे पुरेसे रुंदीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे बहुतेक ठिकाणी वाहनांना समोरासमोरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

घाटरस्त्याच्या माथ्याच्या दोन्ही बाजूंच्या तीव्र चढउतारावर अरुंद रस्ता आहे. चढउतारावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांत वाहने घसरून थेट खोल दरीत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळेदुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. पर्यटकांसह नागरिकांची वर्दळ अलिकडच्या काळात वाढली आहे. घाटरस्ता अरुंद असल्याने अद्याप रांजणे पाबे घाटातून एसटी बस सेवा सुरू झाली नाही. खानापूर ते रांजणेपर्यंत रस्ते चकाचक डांबरी केले आहेत. मात्र, मुख्य घाटरस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. खड्ड्यांतून ये-जा करताना विद्यार्थ्यांसह कामगार शेतकर्‍यांना जीव मुठीत धरावा लागत आहे .

राजगड तोरणा भागात जाणार्‍या पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. धोकादायक ठिकाणीच घाटरस्त्याची चाळण झाली. वारंवार मागण्या करूनही बांधकाम विभाग दखल घेत नाही.

– किसनराव जोरी, माजी उपसभापती, हवेली तालुका पंचायत समिती

या रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याची तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे. रांजणे ते पाबे या मुख्य घाटरस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.

– आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, हायब्रिड  अम्युनिटी प्रकल्प

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news