देशात 43 लाख टन साखरेचे उत्पादन; महाराष्ट्राची आघाडी | पुढारी

देशात 43 लाख टन साखरेचे उत्पादन; महाराष्ट्राची आघाडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात यंदा ऊसगाळप हंगामाने आता जोर पकडला आहे. 30 नोव्हेंबरअखेर 511 लाख टनाइतके ऊसगाळप पूर्ण झाले असून, 43 लाख 20 हजार टनाइतके नवे साखर उत्पादन हाती आल्याची माहिती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. दरम्यान, ऊसगाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी असून, साखर उतार्‍यात मात्र उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे.

देशात राज्यनिहाय स्थिती पाहता महाराष्ट्रात 172 लाख टन ऊसगाळप होऊन सर्वाधिक 13.50 लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 144 लाख टन ऊसगाळपातून 13 लाख टन साखर उत्पादन तयार झाले आहे. तर 130 लाख टन ऊसगाळप आणि 11 लाख टन साखर उत्पादन तयार करून कर्नाटक तिसर्‍या स्थानावर आहे. सरासरी 9.05 टक्क्यांइतका साखर उतारा मिळवीत उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. त्या पाठोपाठ कर्नाटकचा साखर उतारा 8.50 टक्के आहे, तर 7.85 टक्के साखर उतारा मिळवीत महाराष्ट्र तिसर्‍या स्थानावर आहे. अर्थात, थंडी सुरू झाल्यानंतर साखर उतार्‍यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.

इथेनॉल खरेदी दरवाढ रखडल्याने संभ्रम

केंद्र सरकारने इथेनॉलचे वर्ष 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर करण्याचा निर्णय घेऊनसुद्धा डिसेंबर महिना सुरू होऊनही इथेनॉलच्या खरेदी दरवाढीची अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे इथेनॉल तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये संभ—म निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाशी पाठपुरावा केल्यानंतर असे सांगण्यात आले की, इथेनॉलचे नवीन दर जाहीर होण्यात विलंब झाला असला, तरी नवे दर 1 नोव्हेंबर 2023 नंतर पुरवठा केलेल्या इथेनॉलला लागू होतील, असा दावाही दांडेगावकर यांनी केला आहे.

हेही वाचा

Back to top button