

खडकवासला : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कुणबी नोंदी शोधमोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, हवेली तालुक्यात या नोंदी शोधण्यासाठी पुरेसे मोडीवाचक उपलब्ध नसल्याने शोधमोहीम मंदावल्याचे चित्र पुढे
आले आहे. आतापर्यंत 130 महसुली गावांपैकी केवळ 28 गावांच्या जन्म-मृत्यू रजिस्टरची तपासणी पूर्ण झाली आहे. 28 गावांत 5 हजार 600 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. याशिवाय शिक्षण विभागाच्या तपासणीत 833 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पुण्यातील हवेली (ग्रामीण) तहसील कार्यालयात कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्ष सुरू केला आहे.
तहसीलदार किरण सुरवसे यांच्या देखरेखीखाली नायब तहसीलदारांसह आठ कर्मचार्यांसह पाच मोडीवाचक नोंदी शोधण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत राबत आहेत. मात्र, दस्तांची संख्या हजारो आहे. 28 गावातील तब्बल साठ हजारांवर दस्तऐवज तपासण्या आले आहे. राज्यात सर्वाधिक अधिक कुणबी नोंदी हवेली तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये असलेल्या गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टर, तसेच महसूल व इतर विभागांच्या दस्तावेजात असल्याने प्रशासनाने कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुरेसे मोडीवाचक व कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पर्यतची जन्म-मृत्यू रजिस्टर शिवाय इतर कागदपत्रेही तपासण्या येणार आहेत. बहुतेक दस्तऐवज मोडी लिपीत आहेत. त्यामुळे मोडी वाचकांची गरज आहे. मोडी वाचकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन हवेली तालुका तहसील कार्यालयाने केले आहे..
हेही वाचा