पुणे : चाकण येथे कोयत्याने हल्ला करून युवकाचा निर्घृण खून; एकजण गंभीर | पुढारी

पुणे : चाकण येथे कोयत्याने हल्ला करून युवकाचा निर्घृण खून; एकजण गंभीर

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे इंगळे गावाच्या हद्दीत भर चौकात कोयत्याने सपासप वार करत तरुणाचा खून करण्यात आला. खून झालेल्या तरुणाचा मित्र देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रितेश संजय पवार (वय ३०, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र संदेश भोसले ( रा. महाळुंगे, ता. खेड) हा गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी (दि. २६) सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर महाळुंगे इंगळे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर रेणुका हॉटेलच्या समोरील चौकात घडली. या घटनेमुळे चाकण एमआयडीसी आणि महाळुंगे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी रितेश पवार आणि हल्लेखोर यांच्यात गाडीला कट मारल्याच्या आणि रागाने पाहिल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि वाद झाला होता. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास हल्लेखोरांच्या टोळक्याने रितेश संजय पवार आणि संदेश भोसले यांच्यावर कोयते आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. रितेश पवार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळचा असलेल्या गॅसच्या दुकानात शिरला; मात्र हल्लेखोरांनी तिथेच त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. संदेश देखील यात जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले आहेत. पूर्ववैमनस्य आणि सकाळी घडलेल्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. सहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून फरार झालेल्या हल्लेखोरांच्या शोधासाठी महाळुंगे इंगळे पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. हल्लेखोरांमध्ये स्थानिकांसह बाहेरील युवकांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महाळुंगे येथील घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. महाळुंगे येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्व शांतता आहे.

हेही वाचा 

Back to top button