चांगली बातमी : गुन्ह्यांच्या आकड्यांचा आलेख उतरतोय | पुढारी

चांगली बातमी : गुन्ह्यांच्या आकड्यांचा आलेख उतरतोय

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यंदा शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी वेगवेगळ्या संकल्पना अंमलात आणल्या. पोलिसांमध्ये अंतर्गत स्पर्धा लावून राबविलेली अवैध हत्यारांची यशस्वी मोहीम त्याचाच एक भाग आहे. त्याशिवाय, फरारी आरोपी पकडणे, अवैध दारूधंद्यावरील छापेमारीसह वेगवेगळे टास्क देऊन शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ने गेल्या वर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांतील गुन्हेगारीचा आढावा घेतला असता बहुतांश गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तालय स्थापनेपासून गुन्ह्यांच्या आकड्यांची वाढत असलेली सूज यंदा हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

खून, खुनाचा प्रयत्नाचे प्रकार घटले

शहर परिसरात गेल्या वर्षी पहिल्या दहा महिन्यांत 68 जणांचे खून झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामध्ये तत्कालीन कारणावरून खून होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यंदा खुनाचा आकडा 54 इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 14 ने घट झाली आहे. तसेच, गेल्या वर्षी 102 जणांवर खुनी हल्ले करण्यात आले होते. यंदा त्यातही नऊने घट झाली आहे.

जबरी चोरीवर अंकुश

मागील काही वर्षांत पादचार्‍यांच्या अंगावरील सोने तसेच हातातील मौल्यवान वस्तू ओढून नेण्याचे प्रमाण वाढू लागले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांची पायी गस्त सुरू करण्यात आली. तसेच, कोम्बिंग, अचानक नाकाबंदी करून सराईतांची पोलिसांनी कोंडी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात आली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत जबरी चोरीच्या घटनेत 105 ने घट झाली आहे. मागील वर्षी जबरी चोरीचे 391 गुन्हे दाखल आहेत. तर, यंदा 286 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनसाखळी चोरांची मुस्कटदाबी करण्यात पोलिसांना चांगले यश मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 119 जणांच्या गळ्यातील सोने हिसकावण्यात आले होते. तर, यंदा केवळ 74 घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये देखील 45 ने घट झाली आहे.

वाहनचोरीसह इतर चोर्‍याही कमी

शहरात वाहनचोरीसह अन्य चोर्‍यांमध्ये  देखील कमालीची वाढ झाली होती. दरम्यान, पोलिसांनी प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी बसची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरीची वाहने शहराबाहेर घेऊन जाण्यापूर्वी इतके सोपे राहिले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनचोरीमध्ये 180 ने घट आहे. तर, एकूण चोरीच्या घटना 364 ने कमी झाल्या आहेत.

दंगा, तोडफोडीच्या घटना रोखल्या

मागील काही वर्षात दहशत पसरविण्यासाठी रस्त्यावरील गाड्या फोडण्याचे फॅड वाढले होते. ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी तोडफोडीच्या घटनांमध्ये अन्य गंभीर कलमांचा वापर करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे अशा घटनांमध्ये सहजासहजी जामीन मिळवणे शक्य होत नाही. याचाच परिणाम होऊन तोडफोडीच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 38 ने फरक पडला आहे.

‘आर्म अ‍ॅक्ट’च्या  कारवाया वाढल्या

गुन्हेगारांची मुस्कटदाबी करण्यासाठी गुन्हे शाखेकडून कोम्बिंग ऑपरेशनसह दररोज रात्री आरोपी चेकिंग आणि इतर उपक्रम राबवले जातात. यामध्ये आर्म अ‍ॅक्टच्या कारवायांमुळे गुन्हेगारांवर जरब बसतो. यंदा 80 जणांवर ‘आर्म अ‍ॅक्ट’नुसार कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षी केवळ 40 शस्त्र पकडल्याची नोंद आहे.
शहरातील एकूण गुन्हेगारी रोखण्यासाठी यावर्षी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे गुन्ह्यांच्या तुलनात्मक आकडेवारीमध्ये फरक दिसून येत आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे उपाययोजना राबवून गुन्हे रोखण्यासोबत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील.
-विनय कुमार चौबे,  पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड 
हेही वाचा 

Back to top button