Pune News : गंगाधाम चौकात लॉन्ड्रीचे दुकान आगीत भस्मसात | पुढारी

Pune News : गंगाधाम चौकात लॉन्ड्रीचे दुकान आगीत भस्मसात

बिबवेवाडी /पुणे : मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकाजवळ गगन इन्क्लू सोसायटीतील प्रेस्टीज लॉन्ड्री या दुकानाला पहाटे पाचच्या
सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानांच्या परिसरामध्ये तेथील कामगार झोपलेले होते. अचानक धुराचा वास आल्याने बघितले असता ते काम करीत असलेल्या दुकानाला आगीने पूर्णपणे व्यापलेले होते.
तत्परतेने कामगारांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्रात जाऊन तत्काळ कर्मचार्‍यांना माहिती दिली. अग्निशामक दलाची गंगाधाम चौक व कोंढवा केंद्रामधून गाड्या येईपर्यंत दुकानातील कपडे, ड्रेस, साड्या आगीत भक्ष्यस्थानी पडले होते.
घटनास्थळी गंगाधाम चौक अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुनील नाईकनवरे, फायरमन जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, रवी बारटक्के, खेडेकर, वाहनचालक कदम यांनी तातडीने कार्यवाही करून सुमारे एक तासाने आग आटोक्यात आणली.   या आगीमध्ये गंगाधाम चौक परिसर शांतीनगर, कोंढवा या ठिकाणच्या मोठमोठ्या ग्राहकांच्या अतिमौल्यवान साड्या, घागरा ड्रेस, कपडे जळाल्यामुळे मालक हतबल होऊन बसले होते.
’माझ्या लॉन्ड्रीच्या दुकानाला आग लागलेली माहिती कामगारांनी कळवल्यानंतर तातडीने मी दुकानात आलो. ग्राहकांची कपडे, फर्निचर साहित्य, महागडे ड्रेस कामगारांची रोख 25 हजार रुपये इत्यादीसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
– प्रीतम ससाणे, प्रेस्टीज ड्राय क्लिरनचे मालक
गंगाधाम चौक अग्निशमन दलाच्या केंद्रासमोरील इमारतीमधून धुराचे लोट आलेले दिसताच सकाळी सहा वाजता आम्ही कर्मचारी व गाड्या घेऊन जाऊन आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु आगीत दुकानातील फर्निचर, ड्रेस कपडे साड्या व इतर वस्तू जळून खाक झाल्या होत्या. सुमारे एक तासाने आम्ही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
– सुनील नाईकनवरे, गंगाधाम चौक अग्निशमन दल केंद्रप्रमुख.
हेही वाचा

Back to top button