बारामती : पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बारामतीतील धनगर समाज आक्रमक झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत धनगर समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बारामतीतील चंद्रकांत वाघमोडे हे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आजचा उपोषणाचा अकरावा दिवस आहे. सरकारने उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्या उपोषणाकडे लक्ष न दिल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज पासून महाराष्ट्रातील 288 तर 48 खासदारांच्या दारात शांततेच्या मार्गाने बसण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी महाराष्ट्रातील धनगर बांधवांना केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्य व केंद्र सरकारचा यावेळी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा