Pune News : सुट्या मिळत नसल्याने पोलिस दलात नाराजी | पुढारी

Pune News : सुट्या मिळत नसल्याने पोलिस दलात नाराजी

दत्ता भालेराव

भामा आसखेड : पोलिस दलात सध्या मनुष्यबळाची प्रचंड वानवा असून, वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या बाबीमुळे पोलिस दलातील कर्मचार्‍यावर सध्या असह्य ताण निर्माण झाल्याचे चित्र असून, याचा बांध कधीही फुटू शकतो या थराला स्थिती गेलेली आहे. दररोज काही ना काही घडणार्‍या घटना आणि सतत बंदोबस्त त्यातच अत्यंत तुटपुंजे मनुष्यबळ यामुळे पोलिसांना दिवसरात्र कर्तव्यावर राहावे लागत आहे. कोणताच सण कुटुंबासमवेत साजरा करता येत नसल्याने पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचारीवर्ग सध्याच्या दिवाळी सणात दुःखी खिन्न मनाने आपले कर्तव्य बजावत आहेत.

महाराष्ट्रात गणपती उत्सव, नवरात्र, रमजान ईद, मोहरम, दसरा दिवाळी, महाशिवरात्री, आषाढी व कार्तिक एकादशी, श्रावणी सोमवार तसेच गावपातळीपासून ग्रामपंचायत, सोसायटी, बँका, सहकारातील ते लोकसभापर्यंतच्या निवडणुका, शहरातील दैनंदिन वाहतूक नियमन कोंडी, सतत व्हीआयपी बंदोबस्त आणि राज्यात इतरत्र अचानक घडणार्‍या अघटित घटना यामुळे पोलिसांना उसंतच मिळणे अशक्य झाले आहे, सतत कर्तव्य बजवावे लागत आहे.

अनेक पोलिस ठाण्यात मंजूर पोलिस संख्याबळापेक्षा अत्यंत तुटपुंजे,अपुरे मनुष्यबळ असल्याने उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड असह्य ताण येत आहे. बहुसंख्य गावांत शहरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढल्याने सतत वाढती गुन्हेगारी,पोलिस ठाण्यात दररोज येणार्‍या तक्रारी आणि त्यांचा निपटारा यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीआयपी) बंदोबस्त अशा अनेक कारणांमुळे पोलिसांची ससेहोलपट सध्या सुरू आहे. यामुळे पोलिसांना ताणतणावाखाली जीवन जगावे लागत आहे. यापूर्वी स्थिती थोडीतरी बरी होती त्यामुळे साप्ताहिक सुटी कधीमधी अडचणीला रजा मिळत असे परंतु सध्या त्यावर गदा आलेली आहे.

पोलिस कर्मचार्‍यांना नातेवाइकांचे लग्न, वाढदिवस तसेच स्वतःच्या गावची जत्रा-यात्रा व धार्मिक कार्यक्रमालाही जाता येत नाही.‘जिथे कमी तिथे आम्ही’ अशी पोलिस दलाची अवस्था झाली आहे. अनेक पोलिस ठाण्यात संख्याबळ अपुरे असल्याने उपब्लध संख्याबळावर काम करताना पोलिसांना अनंत अडचणी येत असल्याने त्यांच्यावरील ताण वाढत आहे. प्रत्येक ठाण्यात पोलिस संख्याबळ वाढविणे ही सध्याची तातडीची निकड आहे.

कुटुंबासमवेत कधीही सण साजरा नाही

राजगुरुनगर पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचार्‍यांना सुटी नसून, सर्वजण कर्तव्य निभावताना दिसत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही अधिकारी व पोलिस कर्मचारी म्हणाले, आम्हाला कधीच कुटुंबासमवेत सण साजरा करता येत नाही. साधा वाढदिवस साजरा करता येत नाही. साप्ताहिक सुटीदिनी काही घटना घडली तर कर्तव्यावर हजर व्हावे लागते. सणाला सुटी मिळावी, अशी माफक अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली.

हेही वाचा

बेक्ड कॉर्न टोस्ट खायचाय! जाणून घ्या रेसिपी

Maratha Reservation : कालमर्यादा स्पष्टीकरणास मागासवर्ग आयोगाची असमर्थता

मनोरंजन : ‘ओटीटी’वर सेन्सॉरशिप?

Back to top button