Pune News : ‘छगन भुजबळ यांच्या विधानाशी सहमत नाही’ : उदयकुमार आहेर | पुढारी

Pune News : ‘छगन भुजबळ यांच्या विधानाशी सहमत नाही’ : उदयकुमार आहेर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून मराठा समाजाला लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करणार आहोत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे यांच्याबद्दल जी वक्तव्य केली त्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणासाठी चळवळीत काम करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकार्‍यांची बैठक पुण्यात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली जवंजाळ, प्रदेश चिटणीस संतोष मराठे, चिटणीस पंजाबराव देशमुख आदी उपस्थित होते.

आहेर म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षणाविषयीची योग्य भूमिका लवकरच पक्ष कार्यकर्त्यांसमोर आणि जनतेसमोर मांडतील.’ कुणबी नोंदी आढळलेल्या मराठी समाजातील नागरिकांची विशिष्ट मुदतीत जात पडताळणी करून त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे, आण्णासाहेब पाटील मंडळास आर्थिक तरतूद करून उद्योजकांना कर्ज वाटप करताना अटी व नियम शिथिल करावेत, तरुणांना कर्जवाटप करताना सहकारी बँकांनाही आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्याची तरतूद करण्यात यावी यासाठी शासनाने आदेश द्यावे, यासंबंधी ठराव संमत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button