

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (दि. ५) १६ हजार ५८९ पैकी ११ हजार ८१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदार यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच वार्ड क्रमांक सहामध्ये दोन युवा नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.
नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा सामना चुरशीचा पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७६.८९ टक्के मतदान झाले होते. या वेळी एकूण मतदानात ६.४४ टक्के घट झाली. जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून दोन्ही गटाकडून जोरदारपणे प्रयत्न सुरू आहेत. नारायणगाव ग्रामपंचायतची निवडणूक संवेदनशील असल्यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी देखील नारायणगावला भेट दिली आहे. पोलिसांचे पथक सतत सहा प्रभागामध्ये फिरत असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
निवडणुकीसाठी माजी सरपंच योगेश पाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, सूरज वाजगे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुक्ताई-हनुमान ग्रामविकास पॅनेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित खैरे, युवा नेते अमित बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री बोरकर, एकनाथ शेटे, अशोक पाटे, रमेश मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आला होता. सदस्यांच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकनियुक्त सरपंचपदासाठी श्री मुक्ताई-हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या डॉ. शुभदा वाव्हळ तर श्री मुक्ताई- हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी यांच्यातच अटीतटीची सरळ लढत होणार असल्याचा अंदाज मतदानानंतर व्यक्त होत आहे.
माधवी मुरलीधर फुलसुंदर या बंगळूरू येथे आयटी इंजिनीअर आहेत. त्या आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बंगळूरू येथून विमानाने नारायणगाव येथे आल्या होत्या. मागील चार निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे. मात्र मतदार यादीतून नाव गायब झाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
फेर मतदारयादी जाहीर झाल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर सुमारे २ हजार २०० बोगस मतदार कमी करण्यात आले. या गोंधळात नारायणगावतील बहुतेकांची नावे मतदार यादीतून गायब झाली. काही मतदारांचे प्रभाग बदलण्यात आले. यामुळे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मतदारांना धावपळ करावी लागली. याचा एकूणच परिणाम मतदानावर झाला आहे. घटलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील कमी झालेली नावे मतदार यादी समाविष्ट करावी अशी मागणी मतदारापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी केली.