ड्रग्ज माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात; आर्थररोड कररागृहातून पुण्यात दाखल | पुढारी

ड्रग्ज माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात; आर्थररोड कररागृहातून पुण्यात दाखल

 पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याची सोमवारी (दि. ३०) मुंबई येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ललितला घेऊन मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या दरम्यान पुण्यात दाखल झाले. त्याला बुधवारी (दि. १) दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ३१) दुपारी ललीतसह तिघांना आर्थररोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

ललित पाटील, राहुल चौधरी, शिवाजी शिंदे अशी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. महिनाभरापूर्वी पुणे पोलिसांनी ससूनच्या गेटवरून तब्बल 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. याप्रकरणी सुभाष मंडल आणि रौफ शेख यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडील तपासात ह्या ड्रग्जच्या व्यवहारतील मास्टर मांईंड हा ललित पाटील असल्याचे निष्पन्न झाले होते. तो ससून रूग्णालयात राहुन हे ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. याच धर्तीवर अटक होण्याच्या भितीने तो ससून रूग्णालयातून पळून गेला होता. त्याला पळून जाण्यास त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक मंडल, त्याची मैत्रीण प्रज्ञा पाटील, रोझरी स्कुलचा विनय अर्‍हाना, त्याचा चालक डोके यांनी मदत केली होती. पुढे या प्रकरणात भुषण पाटील व बलकवडेला नेपाळ बॉर्डरवरून अटक झाली. त्याचवेळी दुसरीकडे ललित मुंबईच्या साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई तसेच इतर ठिकाणच्या धागेदोरे धुंडाळले. सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान त्याचा ताबा घेण्यास पुणे पोलिसांना कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी मुंबई आर्थररोड कररागृहातून त्याच्यासह तिघांना ताब्यात घेऊन पुण्यात आले.

Back to top button