कोजागिरी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी, तुम्ही दुध पिऊ शकता का? जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगते | पुढारी

कोजागिरी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी, तुम्ही दुध पिऊ शकता का? जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगते

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कोजागरी पौर्णिमा म्हणजे मध्यरात्री चंद्रप्रकाशात पेलाभर मसालेदार दूध प्यायचे, हा आपल्या वर्षानुवर्षांचा परिपा…पण, यंदा नेमके चंद्रग्रहण आल्याने रात्री केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्यावे आणि ग्लासभर दूध पिऊ नये. तर दुसर्‍या दिवशी ग्लासभर दूध प्यावे…हे आवाहन आहे दाते पंचागाचे मोहन दाते यांचे.

यावर्षी शनिवारी (दि.28) कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. रात्री 1 वाजून 5 मिनिटे ते 2 वाजून 23 मिनिटे असा ग्रहणाचा काल आहे. त्यापूर्वी दुपारी तीन वाजून 14 मिनिटांपासून सुरु होणार्‍या वेधकाळात दरवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल. परंतु यंदा कोजागरी पौर्णिमेला ग्रहणामुळे प्रसाद म्हणून एरवी आपण जे ग्लासभर दूध प्राशन करतो तसे आपल्याला करता येणार नाही. फक्त प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्यावे आणि राहिलेले दूध दुसर्‍या दिवशी प्यावे, असे दाते यांनी सांगितले.

शनिवारी (दि.28) भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल. हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. शनिवारी दुपारी 3 वाजून 14 मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळावेत. देवतांची सायंकाळची पूजा, आरती, पालखी आदी सर्व वेधकाळात करावे. कोजागरीच्या दिवशी मुलांना औक्षण केले जाते, ते वेधकाळात सुद्धा करता येईल, असेही दाते यांनी सांगितले. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवारी सायंकाळी सात वाजून 41 मिनिटांपासून वेध पाळावेत. वेधकाळामध्ये भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध आदी करता येतील. ग्रहणकाळात म्हणजे रात्री 1 वाजून 5 मिनिटे ते 2 वाजून 23 मिनिटे या काळात पाणी पिणे, झोपणे या क्रिया करू नयेत, असे दाते यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का?

Back to top button