दत्तात्रय नलावडे
वेल्हे: राजगड तालुक्यातील तोरणागडाच्या खोर्यातील दुर्गम केळद येथे 65 लाख रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. ग्रामस्थांनी वांरवार विनंती करून देखील योजनेच्या जलवाहिनीचे काम अर्धवट अवस्थेत खितपत पडले आहे. त्यामुळे जुन्या योजनेच्या पाण्यावर ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना कशीबशी तहान भागवावी लागत आहे. याबाबत प्रशासन सुस्त आहे, तर ग्रामस्थ अपुर्या पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत.
तीन वर्षांपूर्वी पाणी योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले. सुरुवातीला ठेकेदाराने वेगाने काम करून पाण्याची टाकी उभारली तसेच काही जलवाहिनी देखील बसविल्या. मात्र, गेल्या वर्षांपासून मुख्य जलवाहिनीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. असे असताना गावात अंतर्गत जलवाहिन्यांना नळजोडणी देण्याचे काम सुरू केले आहे.
दोन वर्षांपूर्वी जलजीवन योजनेची पाण्याची टाकी उभारली आहे. मात्र, जलवाहिनी अर्धवट असल्याने टाकीत पाण्याचा थेंबही पडत नाही. टाकी कोरडी ठणठणीत आहे. मुख्य जलवाहिन्याचे काम अगोदर पूर्ण करण्यात यावे आणि नंतर अंतर्गत नळजोडणी देण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी केळदचे माजी सरपंच व राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे यांनी केली आहे. जलजीवन योजनेच्या अर्धवट कामाबाबत रमेश शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे.
केळद गाव व परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. मात्र, अधिकारी व ठेकेदारांच्या हालगर्जीपणामुळे दोन वर्षांपासून या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपासून वारंवार विनंती करून देखील जलवाहिनीचे काम पूर्ण केले नाही.
- रमेश शिंदे, माजी सरपंच, केळद
केळदच्या पाणी योजनेच्या टाकीचे काम चांगल्याप्रकारे झाले आहे. मात्र, जलवाहिनी टाकण्यासाठी काही नागरिकांनी विरोध केला. त्या वादामुळे काही काम अर्धवट आहे. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत ग्रामस्थांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. सर्वत्र जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गावाला जलजीवन योजनेचे पाणी मिळणार आहे.
- चेतन ठाकूर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, राजगड तालुका