

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीत उद्यापासून (दि.30) गुगल पे सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पीएमपीचे तिकीट कॅशलेस पद्धतीने काढता येणार आहे. यामुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळाला असून, पीएमपीच्या तिकीट वाटमधील भ्रष्टाचार आता बंद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला आता सात वर्षे होत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत पीएमपीमध्ये डिजिटल तिकीट यंत्रणा अस्तित्वात नव्हती. परिणामी , वाहक आणि प्रवाशांमध्ये सातत्याने तिकीट वाटपावरून वाद होत आणि अनेकदा भ्रष्टाचार देखील होत. हे रोखण्यासाठी दै. 'पुढारी' च्या वतीने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेत, पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पीएमपीच्या बस गाड्यांमध्ये क्यू आर कोड म्हणजेच गुगल पे तिकीट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याची प्रथम 16 ते 30 सप्टेंबर 2023 रोजी बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. टी चाचणी यशस्वी झाल्यावर अध्यक्ष सिंह यांनी ही गुगल पे सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या (दि.1) पासून ही सेवा सुरू होणार आहे. या सेवेचे उदघाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूड आगारात 12.00 वाजता करणार आहेत.
– उद्या दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी पासुन सुरुवात.
– कोथरूड आगारात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ.
– प्रवाशांना तिकिटासाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार.
– वाहकाच्या ई – तिकीट मशीनमध्ये तिकीट रक्कमेचा क्यू-आर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे पेमेंट करता येणार.
– कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
– तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांची समस्या संपुष्ठात येणार
– वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार
– महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा होणार
– लवकरच महामंडळाचे मोबाईल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, प्रवासाचे नियोजन व मोबाईल टिकिटिंग सुविधा
महामंडळाकडून सुरु करण्यात येणार
– डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार
– वाहकाकडे ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे
– क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
– वाहकाकडून निर्माण होणारे आपले तिकीट प्राप्त करणे