पुणे: बारामती शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस | पुढारी

पुणे: बारामती शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

बारामती: पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्याला आज (दि. ३) दुपारी चारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले. शहरातील रस्ते पाण्याने भरले गेले. जनजीवन विस्कळीत झाले. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरात सायंकाळी साडेचार नंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात पावसाने जोर पकडला. मुसळधार पाऊस सुमारे तासाभराहून अधिक काळ बरसला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील अनेक रस्ते, पुलांवर पाणी साचून राहिले. त्यात दुचाकी, मोटारी अडकून बंद पडल्या. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेल्या तीन महिन्यांपासून बारामती शहर व तालुक्यात पावसाने दडी मारली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेला पाऊस सुखावणारा ठरला. तालुक्यातील पिंपळी लिमटेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेतजमिनी पाण्याने भरून पाण्याचे लोट वाहू लागले.
आज सकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळी काळोख पसरला. शहरातील नीरा रस्त्यावर तर कऱ्हा नदीच्या पुलावर चारचाकी वाहनांची चाके पाण्यात बुडली होती. अनेक दुचाक्या पाण्यात अडकून बंद पडल्या. रस्त्यावर तळी साचली. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Back to top button