

वेल्हे : पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी 1957 मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पानशेत धरण फुटीला शुक्रवारी (दि. 12) 63 वर्षे पूर्ण होत आहेत. धरण फुटीनंतर धरणांच्या सुरक्षेसाठी शासनाने वेळोवेळी कायदे आणि नियमावली तयार केली. पानशेतसह खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
1961 मध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पानशेत खोर्यात अतिवृष्टी सुरू होती. अतिवृष्टीच्या पुराने 12 जुलै रोजी पानशेत धरण फुटले. पुण्यातील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खडकवासला धरण फोडावे लागले. पानशेत फुटीचे साक्षीदार असलेले जुन्या धरणाचे खांब आजही धरणाच्या भिंतीजवळ उभे आहेत. ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या जुन्या खडकवासला धरणाचे भग्न अवशेष धरणाखाली आहेत.
पानशेत, सिंहगड, खडकवासला भागातील वयोवृद्ध शेतकरी, महिला धरण फुटीच्या जुन्या कटू आठवणींना आजही उजाळा देतात. 63 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले आणि प्रलयाने पानशेत, कुरण खुर्द, कुरण बुद्रुक, सांगरुण, मांडवी बुद्रुक, मालखेड, खानापूर, गोर्हे खुर्द खडकवासला, शिवणे, नांदेड भागांसह पुणे शहर व परिसरात हाहाकार उडाला होता. त्यानंतरच राज्यासह देशभरातील धरणांच्या सुरक्षेसाठी शासनाला खबरदारी घेण्यास भाग पाडले.
पानशेत धरण फुटल्यानंतर खडकवासला धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढली. खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे उघडूनही धरणाच्या भिंतीवरून पाणी वेगाने फेकले जात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांधलेले पानशेत धरण तळासह भगदाड पडून वाहून गेले. मात्र, इंग्रज राजवटीत 1879 मध्ये बांधलेल्या खडकवासला धरणाचा एकही दगड प्रचंड महापुरातदेखील हलला नाही.
खडकवासला धरणाखालील गावांसह पुण्यात पुराने थैमान घातले. पुराचा वाढता धोका पाहून प्रशासनाने खडकवासला धरण फोडण्यासाठी लष्कराला पाचारण केले. हेलिकॉप्टरमधून धरणाच्या मुख्य भिंतीवर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. त्यामुळे खडकवासला धरणाच्या मुख्य भिंतीला भगदाड पडले. त्यानंतर पूर ओसरला.
दि. 12 जुलै रोजी सकाळी गोर्हे खुर्दच्या गावठाणात पाणी शिरले. श्रीभैरवनाथ मंदिर व परिसरातील घरांना पाण्याने वेढले. शेती-वाडी बुडाली. जीव वाचवण्यासाठी मुलं-बाळांना घेऊन मोठी माणसे, महिलांनी डोंगर-टेकड्यांकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरा पूर ओसरला. त्या वेळी मृत जनावरे, झाडे पाण्यात तरंगत होती. धरणाच्या तीरावर माशांचे खच पडले होते.
गुणाजी घुले, ज्येष्ठ शेतकरी, गोर्हे खुर्द (ता. हवेली).