

खडकवासला: कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन रखडले आहे. कडकडीत उन्हामुळे दौंड, हवेली, इंदापूरसह जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर शेतीसह परिसरातील लाखो नागरिक आवर्तनाअभावी तहानलेली आहेत.
सल्लागार समितीची बैठक तातडीने घेऊन या महिनाअखेरीस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. खडकवासला धरणसाखळीत गुरुवारी सायंकाळी 18.63 टीएमसी (63.20 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीपेक्षा धरणसाखळीत यंदा सुमारे 2 टीएमसी अधिक पाणी आहे.
गेल्या वर्षी सद्य:स्थितीत धरणसाखळीत 16.86 टीएमसी (57.84 टक्के) इतका पाणीसाठी होता. खडकवासला धरणातून शेतीसाठीचे आवर्तन बंद असल्याने सध्या केवळ वरसगाव धरणातून 600 क्युसेक पाणी खडकवासलात सोडण्यात येत आहे. एवढेच पाणी पुणे शहर परिसरातील नागरिकांसाठी सोडण्यात येत असल्याने खडकवासला धरणातील पाण्याची पातळी 36 टक्क्यांवर खाली गेली आहे.
जानेवारीमध्ये खडकवासलातून शेतीचे रब्बी आवर्तन बंद करण्यात आले. त्यानंतर जवळपास दोन महिने शेतीचे पाणी बंद असल्याने धरणसाखळीत सध्या गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.
दौंड, हवेलीसह खडकवासलाच्या लाभ क्षेत्रातील उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने अद्यापही पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही. दरम्यान, या महिन्याच्या तिसर्या आठवड्यात अथवा महिनाअखेरीस उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार असल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.