पुणे : राहू येथील म्हशीच्या गोठ्यावरील कामगाराचा खून करणाऱ्यास अटक | पुढारी

पुणे : राहू येथील म्हशीच्या गोठ्यावरील कामगाराचा खून करणाऱ्यास अटक

यवत; पुढारी वृत्तसेवा : राहू (ता.दौंड) येथील म्हशीच्या गोठ्यावरील कामगाराच्या खून प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहु येथे दिनांक 24 जुलै रोजी रामराव सोनवणे यांच्या म्हशींच्या गोठ्यावरील कामगार भिमकुमार अनिल यादव (वय ३०, रा जयपुर, ता. मेहंदीया, जि. आरवल राज्य बिहार) याचा खून करून मृतदेह शेजारील विहिरीत टाकण्यात आला होता. याबाबत राहूचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी फिर्याद दिली होती.

त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तीन पोलीस पथके तयार करून परिसरातील माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस तपासात हा खून भोला उर्फ जयाकाश जंगलाप्रसाद कुमार (रा. आराहरा ता. वाराणसी, जि. बनारस,राज्य उत्तरप्रदेश) याने केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार संशयित आरोपीला अटक करण्यात आली. शनिवारी (दि. २९) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रशांत मदने, हवालदार निलेश कदम गुरूनाथ गायकवाड अक्षय यादव,सचिन घाडगे, स्था. गु. शाखाचे अजित भुजबळ रामदास जगताप चांदणे अजित काळे,अमित यादव, मारुती बाराते यांचे पथकाने केली आहे.

Back to top button