किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची पुण्यात कारवाई | पुढारी

किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची पुण्यात कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावी हा अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस देखील बजावली होती. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. किरण गोसावी याचा आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्या तो फरार असल्याचे समोर आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला पोहोचले होते . परंतु, हे पथक पोहोचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून पळून गेला होता.

किरण गोसावी याच्याविरुद्ध पुण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात, चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न
दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

हेही वाचलत का?

Back to top button