Accident : पर्यटनासाठी गेलेला पर्यटक गाडीसह खोल दरीत; लोणावळ ग्रामीण पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचवला जीव | पुढारी

Accident : पर्यटनासाठी गेलेला पर्यटक गाडीसह खोल दरीत; लोणावळ ग्रामीण पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचवला जीव

लोणावळा;  पुढारी वृत्तसेवा : टायगर पॉईंट परिसरात फिरायला गेलेला पर्यटक त्याच्या गाडीसह खोल दरीत पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाचा शोध घेऊन जखमी व्यक्तीला वेळीच बाहेर काढण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला. मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिसांना एका महिलेने तिचे पती टायगर पॉईंट परिसरात फिरायला गेले असताना गाडीसह खोल दरीत पडल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी तात्काळ सदरची माहिती उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल सागर धनवे यांना घेऊन टायगर पॉईंट परिसर गाठले. त्याठिकाणी स्थानिक दुकानदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे दरीत पडलेल्या गाडीचा शोध घेतला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील टायगर पॉईंट परिसरातील घुबड तलावाचे जवळ असलेले अंदाजे 60 ते 65 फूट खोल दरीत एक गाडी पडलेली दिसली. पो.उप.नि. भोसले यांनी स्वतः दरीत उतरून दरीत पडलेल्या गाडीतील गौरव ठक्कर (रा. मुंबई) यांना बाहेर काढले. यावेळी ते गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा घडलेला प्रसंग इतका भयानक असताना देखील पो.उप.नि. भोसले यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव धोक्यात घालून दरीत उतरून जखमीस वेळीच गाडीतून बाहेर काढले.

Back to top button