

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे गुरुवारी (दि. २१) भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पाच दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेत दुपारी दीड वाजेच्या सुमारास तोंड बांधलेले ५ दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन घुसले.
यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताने मारहाण करुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि लॉकरमधील सर्व २ कोटी रुपयांचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम पोत्यात भरून बाहेरील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारने पिंपरखेड गावातून वेगात गाडी घेऊन पसार झाले. यावेळी कर्मचारी यांनी बाहेर येऊन आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. या घटनेची माहिती शिरूर पोलीसांना मिळाल्यानंतर तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.
व्यवस्थापक मोहित चौहान यांच्यासह सागर पानमंद, गणेश खैरे, हरि काळे या कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. शिरूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व चौकशी सुरु केली आहे. दरम्यान काठापूर येथे एका हॉटेलमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोने हिसकावून चोरुन नेल्याची घटना घडली आहे.