Pune Crime : दशक्रिया विधीला गेल्याचे पाहून घरफोडीचे नियोजन; ५ लाखांच्या मुद्देमालांसह सराईत गुन्हेगारास अटक | पुढारी

Pune Crime : दशक्रिया विधीला गेल्याचे पाहून घरफोडीचे नियोजन; ५ लाखांच्या मुद्देमालांसह सराईत गुन्हेगारास अटक

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : दशक्रिया विधीसाठी बाहेर गेल्याचे पाहता संधीचा फायदा घेवुन घरफोडी करून पैसे व सोन्याचे दागिने चोरून पोबारा करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ४६ हजार ४८१ रूपये किंमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. आकाश प्रकाश विभुते (वय ३२, रा. ता. जुन्नर, मुळ रहिवासी-जि. सोलापुर) याला अटक करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणमध्ये वाढत्या घरफोड्यांचे प्रमाण पाहता अविनाश शिळीमकर यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार दशक्रिया विधीसाठी गेलेल्या घरात चोरी केल्याच्या घटना दोन ठिकाणी घडल्या होत्या. त्यानुसार तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संशयित आकाश विभुते यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, तो दशक्रिया कोठे आहे याची माहिती घेऊन चोरी करण्याचे नियोजन करत असे. सकाळच्या वेळी कुटुंबातील सदस्य घर बंद करून दशक्रिया विधीसाठी गेले असता तो घरफोडी करून घरातील दागिने व रोख रक्कम आदींची चोरी करत असे. आरोपीने जुन्नर तालुक्यातील गोळेगाव व निरगुडे गावचे हद्दीत याच पद्धतीने घरफोडी करून रोख रक्कम व दागिने आदींची चोरी केली असल्याचे कबूल केले.

त्याच्याकडून ८ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकुन ५ लाख ४६ हजार ४८१ रूपये किंमतीचा माल जप्त केला. आरोपीवर यापुर्वी सोलापुर जिल्हातील सांगोला व करंकब पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा पथकातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीण, चंद्रकांत जाधव, संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, दगडु विरकर या पथकाने केली .

Back to top button