पुणे ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा नीतेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी काढलेली लूकआऊट नोटीस मागे घेण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. थकविलेले सर्व पैसे भरल्याचे डीएचएफएल फायनान्स कंपनीने पोलिसांना कळविल्याने ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.
डीएचएफएल फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या 65 कोटी रुपयांपैकी 61 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात लूकआऊट नोटीस जारी केली होती. डीएचएफएलकडून हे कर्ज घेतले होते. राणे कुटुंबीयांबरोबरच एकूण 30 जणांचा यात समावेश होता. दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार नोंदवली होती. पुणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी 3 सप्टेंबर रोजी लूकआऊट नोटीस बजावली होती.