पुणे: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची 52 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रांतवाडी भागातील शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी एका 52 वर्षीय व्यक्तीची 38 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार टिंगरेनगर परिसरात राहणार्या फिर्यादीला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले. परतावा मिळण्याच्या लालसेपोटी गुंतवणूक केल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.
महिलेला 13 लाखांचा गंडा
कात्रज परिसरातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी 13 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज भागात राहायला आहे. चोरट्यांनी महिलेला संदेश पाठविला होता. शेअर बाजारात रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. महिलेने चोरट्यांच्या खात्यात रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी तिला परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.