इंदापूर : ८ लाखांचे दागिने लंपास केलेल्या चोरट्यांचा ४ तासात तपास; इंदापूर पोलिसांची कारवाई | पुढारी

इंदापूर : ८ लाखांचे दागिने लंपास केलेल्या चोरट्यांचा ४ तासात तपास; इंदापूर पोलिसांची कारवाई

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरालगत असलेल्या माळवाडी येथे चोरट्यांनी 8 लाख 75 हजार रुपये किमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरट्यांच्या ४ तासात मुसक्या आवळून दागिने हस्तगत करण्यात इंदापुर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. ४) अशोक अंकुश व्यवहारे (वय ४३, रा. क्षीरसागर वस्ती माळवाडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे त्यांचे घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास पाचारण करीत गुन्ह्याचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार वेगवेगळया युक्ती वापरून व तांत्रीक विश्लेषण करून सखोल तपास केला गेला.या गुन्हयात दोन संशयित सागर अरुण राऊत (वय २०, रा. टेंभुर्णी कोष्ठी गल्ली) व दादा बळी शेंडगे (वय २१, रा. साठेनगर ता. इंदापुर) यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन या गुन्हयातील चोरीला गेलेले 8 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करुन चोरीचा गुन्हा ४ तासात उघडकीस आणला आहे.

आरोपींना या गुन्हयात अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक (पुणे ग्रामीण) अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस हवालदार प्रकाष माने, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, लखन साळवे, पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोखंडे, लक्ष्मण सुर्यवंशी व महीला पोलीस हवालदर शुभांगी खंडागळे यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button