

Pune Crime News: घरी आलेल्या पंधरावर्षीय अल्पवयीन भाचीवर अत्याचार करत तिला गर्भवती करणार्या नराधम 45 वर्षीय मामाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले.
मे ते ऑक्टोबर 2016 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने अलंकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पीडितेची चुलत बहीण एरंडवणे येथील घरी आल्यानंतर घरात लहान जागा पडत असल्याने ती चुलत बहिणीला घेऊन कोथरूड येथे राहणार्या मामांकडे झोपण्यास जात होती.
यादरम्यान, बायको बाळंतपणासाठी माहेरी गेल्याने त्याचा फायदा घेत आरोपीने बहिणीच्या अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, त्याच्या बहिणीच्या सासर्याचे निधन झाले. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केले.
दिवाळीच्या सुट्टीला पीडिता घरी आल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. तीन महिने उलटूनही मासिक पाळी न आल्याने पीडितेची आरोग्य तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यामध्ये त्यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता, वैद्यकीय अधिकारी व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली.