

निरा: निरा खोर्यातील भाटघर, निरा देवघर, वीर, गुंजवणी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला. परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली होती. परिणामी, निरा नदीला देखील महापूर आला होता. सध्या निरा खोर्यातील चारही धरणांत मंगळवारी (दि. 8) 19 हजार 97 दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजेच 19.097 टीएमसी अर्थात 39.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. निरा खोऱ्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
23 हजार 502 दशलक्ष घनफूटक्षमतेचे असलेल्या ब्रिटिशकाशीन भाटघर धरणामध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता 8 हजार 829 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच 37.57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी 5 हजार 75 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात 21.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
11 हजार 729 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या निरा देवघर धरणात सकाळी सहा वाजता 3 हजार 410 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच 29.07 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी 3 हजार 600 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात 30.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील 9 हजार 408 दशलक्ष घनफूट पाणीसाठाक्षमता असलेल्या वीर धरणात मंगळवारी (दि. 8) सकाळी सहा वाजता 5 हजार 250 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच 55.81 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी वीर धरणात या दिवशी 4 हजार 414 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात 46.92 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गुंजवणी धरणामध्ये 1 हजार 607 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात 43.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी गुंजवणी धरणात या दिवशी 1 हजार 387 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात 37.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. निरा खोर्यातील धरणांमध्ये गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा
चारही धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती आकडेवारीवरून समाधानकारक असल्याचे दिसत आहे. समाधानकारक पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
निरा उजवा व डावा कालव्यातून उन्हाळी आवर्तन
वीर धरणात सध्या 55.81 टक्के पाणीसाठा असल्याने धरणाच्या निरा उजवा कालव्यातून 1 हजार 550 क्युसेकने उन्हाळी आवर्तन सुरू आहे. वीर धरणाच्या निरा डावा कालव्यातून सध्या 827 क्युसेकने उन्हाळी आवर्तन सुरू आहे. उन्हाळी आवर्तन निरा उजवा व डावा कालव्यातून जून महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे वीर धरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.