दै ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : महिला फुटबॉल स्पर्धेचा आजपासून थरार | पुढारी

दै ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप' : महिला फुटबॉल स्पर्धेचा आजपासून थरार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या क्रीडा स्पर्धेला फुटबॉल या खेळापासून शानदार सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघांनी आपला सहभाग नोंदविला असून, नॉकआऊट पद्धतीने या स्पर्धा रंगणार आहेत. दै. ‘पुढारी’च्या वतीने या महिलांच्या क्रीडा स्पर्धांना उद्या गुरुवारी (दि. 17) फुटबॉल या खेळापासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील मैदानावर सकाळी 9 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, सकाळी 9.30 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याने फुटबॉलप्रेमी आणि पुणेकरांना महिला फुटबॉलपटूंचा थरार अनुभवता येणार आहे. दै. ’पुढारी’ च्या ’राईज अप’ महिला फुटबॉल स्पर्धेमध्ये शहर, जिल्ह्यासह 16 संघांनी आपला सहभाग घेतला आहे. या संघांमध्ये पुणेरी वॉथरयर्स, बाय, बेटा स्पोर्ट्स ब, दिएगो ज्युनिअर, क्रीडाप्रबोधिनी, स. प. महाविद्यालय, यूकेएम ब, आयफा बेलगावी, गो स्पोर्ट्स, स्टेपओव्हर, केएमपी, पुणे स्कोअर क्लब, यूकेएम अ, कमांडोज, बेटा स्पोर्ट्स अ आणि अस्पायर एफसी या संघांचा समावेश आहे.

या स्पर्धेला फुटबॉल संघाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राची कर्णधार म्युरिअल आदम, भारतीय महिला लीगच्या एफसी क्लबच्या प्रशिक्षक दर्शना सणस, प्रशिक्षक ऋतुजा गुणवंत, राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजली बारके, राष्ट्रीय फुटबॉलपटू सपना राजपुरे, माविस आदम आदी राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भारतीय संघामध्ये निवड झालेली सुमय्या शेख, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील खेळाडू ऐश्वर्या भोंडे, साक्षी सिरसाट, साक्षी हिवळे, वैष्णवी पवार, अदिती गाडेकर, पूर्वा गायकवाड, प्रेरणा मेश्राम, मेहक शेख आणि दिव्या पवरा आदी खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले असून, नागरिकांमध्ये स्पर्धेबाबत उत्स्कुता आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी सात सामने रंगणार आहेत. त्यामध्ये उद्घाटनाचा सामना बेटा स्पोर्ट्स ब आणि दियगो ज्युनिअर्स यांच्यामध्ये होणार आहे. बेटा स्पोर्ट्स अ आणि एस्पायर एफसी यांच्यामध्ये दुसरा सामना, त्यानंतर गो स्पोर्ट्स आणि स्टेप ओव्हर यांच्यामध्ये तिसरा सामना, केएमपी आणि पुणे स्कॉअर क्लब यांच्यात चौथा सामना, क्रीडाप्रबोधिनी आणि स. प. महाविद्यालय यांच्यामध्ये पाचवा सामना, यूकेएम ब आणि आयफा बेलगवी यांच्यात सहावा सामना, तर यूकेएम अ आणि कमांडोज यांच्यात सातवा सामना होणार आहे.

Back to top button